Friday, 26 May 2017

सुखाचं समाधान की समाधानातलं सुखं ...

घड्याळात ६:३० वाजले तशी ती रोजच्या सारखी आवरून, दरवाज्यावर नवऱ्याची वाट पाहत उभी होती. एव्हाना त्यांच लग्न होऊन जवळजवळ ४ वर्ष झाली होती. अर्थातच त्यांच लग्न, आता काही म्हणावं तितकं नवीन राहिलेलं नव्हतं. पण ताजं मात्र नक्कीच होत. किंबहुना त्यांनी ते तसं ठेवलं होत. छोट्या छोट्या गोष्टींमधून ते दिसत होत, फुलत होत. रोज नवरा घरी यायच्या वेळेला ही तोंडावर पाणी मारून, केस-बिस आवरून फ्रेश व्हायची. गॅसवर ठेवलेला चहा उकळेपरेन्त नवऱ्याची आतुरतेने वाट पाहायची. तो ही, त्याच्या येण्याच्या वेळेनुसार घड्याळ लावावं इतका perfect वेळेला घरी यायचा आणि ही हसून त्याला Welcome करायची. तो फ्रेश होऊन येईपरेंत चहा घेऊन Gallery मध्ये सज्ज असायची. गरमागरम, वाफाळता चहा पीता-पीता गप्पा व्हायच्या आणि दोघांचा दिवसभराचा शीण सहज निघून जायचा. 
आत्ताही आतमधे गॅसवर चहा उकळत होता. कुठल्याही क्षणी तिचा नवरा आलाच असता , पण ...

पण हा कुठून आला? 'हा ... ' तिचा लग्नाआधीचा प्रियकर. एका क्षणात जवळजवळ ५ वर्ष मागे गेली ती. फोटो अल्बमची पानं उलटावी तसे त्याच्याबरोबर घालवलेले सारे क्षण तिच्या नजरेसमोर उभे राहिले. आज इतक्या वर्षांनी  तो अचानक परत कसा आला? कुठून आणि का आला असेल? तिच्या डोक्यात नको नको  त्या प्रश्नांची आणि विचारांची गर्दी झाली. पण तिचा प्रियकर मात्र मोबाईल मध्ये डोकं घालून झरझर जिना चढून वरच्या मजल्यावर गेला. त्यानी हिच्याकडे वळून पाहिलं सुद्धा नव्हतं. 'नजरचुकीनं की मुद्दामून', हिच्या मनात विचार आला. २-४ मिनिटं ती तशीच विचारात हरवली आणि तो मुलीला कडेवर घेऊन तिची बॅग सांभाळत खाली आला. जिन्यात त्यांची नजरानजर झाली.... अगदी काही क्षणांपुरतीच. तेच लाघवी हास्य मागे ठेऊन तो निघूनही गेला.

एव्हाना तिला त्याच्या येण्याचं कारण कळलं होत. आजपासून जोशी काकूंच्या पाळणाघरात जी नवीन, गोंडस मुलगी आली होती तिचा 'हा ' बाबा होता.आपल्या नवऱ्याच्या उत्कट प्रेमात, संसारात बुडालेली ती तिच्या जुन्या प्रियकराला विसरली नव्हती आणि त्याचं जगही इतकं बदललं असेल ह्याची हिनं कल्पनाही केली नव्हती.

ह्या सगळ्या विचारांमधे असतानाच तिचा नवरा घरी आला आणि आत्ताची ही ५ मिनिटं कुठल्या कुठे मागे पडली.
.
.
.

आता हे रोजचंच झालं होत. सकाळी छोटीची आई तिला पाळणाघरात सोडायची. बाल्कनी मधल्या झाडांना पाणी घालताना, ही छोटीच्या आईची रोज होणारी धावपळ पाहायची. हिला तिचं कौतुक वाटायचं. रोज संध्याकाळी ६:३० वाजता हि न चुकता दारात वाट पाहत असायची. तिघांच्याही मनातले भाव शब्दांतून नाही तर नजरेतून व्यक्त व्हायचे.

तिचा नवरा  -
वा...!!! आजही हि माझी वाट पाहतीये. खरंच कित्ती जीव लावलंय हिने. प्रेम प्रेम म्हणजे अजून काय असत?

तिचा प्रियकर  -
आजही हि दारात उभी... आता लग्न झालंय म्हणजे नवऱ्याचीच वाट पाहत असणार नक्कीच. नशीबवान आहे... निदान त्याला तरी हीच खरं प्रेम मिळतंय.

ती -
आता तो येईल ज्याच्यावर मी मनापासून खूप खूप प्रेम करते. ज्याच्या सुखी संसारात मी आकंठ बुडाली आहे. ह्याच्या आनंदातच तर माझं खरं सुखं आहे.

आता तो ही येईल. ज्याच्या आईच्या वचनात बांधली जाऊन मी त्याला सोडलं... दुखावलं... आणि आज तो इतका सुखात, आनंदात असलेला पाहतीये मी. त्याचा सुखातच माझं समाधान आहे.




No comments:

Post a Comment